''जेणें परत्रसाधन| जेणें ग्रंथे होये ज्ञान|
जेणें होईजे पावन| या नाव ग्रंथ॥
- रामदासस्वामी (दासबोध)

नमस्कार!

इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे - "There is always room for a man of force and he makes room for many."

मित्रहो, स्पर्धा कितीही तीव्र असली तरी एखाद्या क्षेत्रात ज्याला खरोखरच 'गती' आहे त्याला वाव मिळतोच व तो आपल्याबरोबर मदतनीस व सहकारी म्हणून इतर काही व्यक्तींकरताही त्या क्षेत्रात 'जागा' निर्माण करतो. नेमकी हीच गोष्ट आम्ही पाच वर्षांपूर्वी, म्हणजे २०१० मध्ये 'अथर्व पब्लिकेशन्स्'तर्फे केली व प्रकाशन व्यवसायात नवे पाऊल टाकले. अर्थात मनात 'स्पर्धेची', इतर नावाजलेल्या प्रकाशकांची 'भीती' तशी होती. पण पुस्तकांच्या दुनियेत प्रथम पुस्तक विक्री, मार्केटींग व त्या अनुषंगाने येणारी इतर वेगवेगळी कामं यांचा आम्हाला जवळपास १५ वर्षांचा 'डोळस' व 'घडविणारा अनुभव' असल्याने आम्ही सरळ 'अथर्व'ची स्थापना केली.

'अथर्व'चा आजचा 'पसारा' तसा वाढलेला आहे. पण जेव्हा आम्ही यात येण्याचं ठरवलं तेव्हा 'प्रस्थापितां'नी आम्हाला अडचणी कशा येतील हे जातीने पाहिले. पण जिंकण्याची इच्छा असणं आणि जिंकण्याच्या इच्छेसाठी पूर्वतयारी करणं यात खूप फरक आहे, हे आम्ही जाणले होते. मित्रहो, एखाद्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, त्याचा छानसा विकास करायचा आहे तर त्याला खास प्रयत्न करावे लागतातच. अर्थात त्याप्रसंगी त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण त्या व्यावसायिकाला ते सारे पर्याय एकाच वेळी वापरता येत नाही. तो असा पर्याय निवडतो जो त्याला सहज मानवेल व त्याचा व्यवसायही वाढवेल. आम्ही नेमके तेच केले. बाजारात ज्या प्रकारची पुस्तकं, ग्रंथ नाहीत ती प्रकाशित करत 'अथर्व'चं असं वेगळं स्थान निर्माण केलं. जनरल नॉलेजसह ललित वाङ्मयातील पुस्तकं प्रकाशित केली. विविध विद्यापीठातील नामवंत/तज्ज्ञ प्राध्यापकांना, लेखकांना लिहितं करत वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं बाजारात आणली. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तकंही विद्यार्थ्यांसमोर ठेवली. एवढंच नव्हे तर 'जर्नल्स्'ही छापली. अभ्यासकांना, प्राध्यापकांना आपले शोधनिबंध प्रसिद्ध करणे सुलभ, सोपे व्हावे यासाठी 'प्लॅटिनम्' व 'डिसकोर्स' हे दोन इंटरनॅशनल जर्नल्स प्रकाशित केलीत. 'आयएसएसएन' नंबरची ही सेवा दिली. विविध विषयांवरची दर्जेदार पुस्तकं म्हणजे 'अथर्व' ही आमची ओळख सध्या झालीये, यापुढेही ती १००% राहणार आहे.

मित्रहो, मॅनेजमेंट गुरू म्हणतात, ''निर्णय वरवर न घेता हृदयापासून असायला हवा. तो घेण्यास थोडा विलंब लागला तरी चालेल, पण विचारांनी तो ठाम असला पाहिजे.'' आम्ही आज कौतुकानेच नव्हे तर अभिमानाने अधोरेखित करू इच्छितो की, 'अथर्व'ने केवळ जळगाव, धुळे, नंदुरबारच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातही आपले पाय भक्कमपणे रोवलेय. यापुढेही रोवणार आहे. 'जीवनाचं सार आदर' असं म्हणत आम्ही सर्व ग्रंथलेखकांचे, ग्रंथप्रेमींचे, ग्रंथविक्रेत्यांचे 'अथर्व'तर्फे मनापासून धन्यवाद मानतो.

शुभेच्छांसह...आपले, सौ. संगीता माळी, श्री. युवराज माळी (अथर्व पब्लिकेशन्स्, जळगाव)