आर्थिक साक्षरता
आजच्या वेगवान आणि सतत विकसित होत असलेल्या जगात, पैसा समजून घेणे, ही आता केवळ ऐषआरामी किंवा श्रीमंतापुरती मर्यादित राहिलेली गोष्ट नसून, ती एक गरज बनली आहे. आधुनिक अर्थव्यवस्थेसाठी व्यक्तींनी माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेणे आवश्यक आहे; मग ते वैयक्तिक बजेट व्यवस्थापित करणे, मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे, सेवानिवृत्तीचे नियोजन करणे किंवा कर्ज आणि विमा यांसारख्या जटिल आर्थिक उत्पादनांचा अर्थ लावणे असेल; आर्थिक साक्षरता म्हणजे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन, बजेट आणि गुंतवणूक यांसह विविध आर्थिक कौशल्ये घेण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता विकसित करणे होय.
आर्थिक साक्षरता हे व्यक्तींना सामान्य आर्थिक अडचणी टाळण्यास मदत करते; जसे की, अनियंत्रित कर्ज, खराब क्रेडिट स्कोअर आणि आणीबाणी किंवा सेवानिवृत्तीसाठी अपुरी बचत. याशिवाय, वित्तीय सेवा अधिकाधिक डिजिटल होत असताना, ऑनलाइन बँकिंग प्लॅटफॉर्म, मोबाइल वॉलेट्स आणि डिजिटल गुंतवणूक साधने कशी वापरायची, हे जाणून घेणे हा आर्थिक साक्षरतेचा आवश्यक भाग आहे.
या पुस्तकाचा उद्देश आर्थिक साक्षरतेसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून काम करणे, गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पनांची सहज पचण्याजोगी प्रकरणांमध्ये मांडणी करणे हे आहे.