बँकिंगची मूलभूत तत्त्वे
आधुनिक युगात बँकांना अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बँका आवश्यकतेनुसार अर्थपुरवठा करीत असल्यामुळे त्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या नाड्या समजल्या जातात. मनुष्याच्या शरीरात रक्तवाहिन्यांना जे महत्त्व आहे तेच महत्त्व बँकांना अर्थव्यवस्थेत आहे. देश विकसित असो अगर विकसनशील असो, त्यात मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असते. बँका प्रत्यक्ष चलन व पतनिर्मितीच्या माध्यमाने अर्थव्यवस्थेला पैशाचा पुरवठा करतात. त्यामुळे बँका अर्थव्यवस्थेच्या प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जातात. देशाच्या आर्थिक विकासात बँकेचे कार्य फार महत्त्वाचे आहे त्यामुळे लोकांना बचतीची सवय लागते तसेच देशातील लोक आपल्या जवळील पैसा बँकेत बचतीच्या स्वरूपात ठेवतात. बँकेकडे ठेवलेल्या बचतीतून बँक गरजू व्यक्तींना व्याजाने कर्ज देते. तसेच देशातील भांडवल निर्मिती बँका मार्फतच होत असते. त्यामुळे विविध राष्ट्रातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण केले जातात, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मुद्रा निर्माण करण्याचे कार्य बँक करत असते. थोडक्यात काय तर आधुनिक काळात देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बँकांना खूप महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे.