व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा
सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्त्वाचा संबंध शरीरयष्टी, शारीरिक जडणघडणीशी लावण्यात येतो. तर काही वेळेला बाह्यस्वरूपावरून व्यक्तिमत्त्व वर्णन करण्यात येते. परंतु हे व्यक्तिमत्त्वाचे मर्यादित वर्णन होय. लोकांवर किंवा दुसर्यांवर छाप पाडण्याची कला म्हणजे व्यक्तिमत्त्व, असे मर्यादित अर्थाने व सर्वसामान्यपणे समजले जाते. आपण समाजात जन्माला येतो, वावरतो, मोठे होतो, त्या वेळी समाजातील आपले स्थान हे आपल्या व्यक्तिमत्त्वामुळेच ठळक होत असते. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये चांगल्या नैतिक गुणांची आवश्यकता फार गरजेची ठरते. वैयक्तिक व सामाजिक व्यवहार पार पाडण्यासाठी भाषा हे एक प्रभावी साधन आहे. भाषा एक प्रकारे व्यक्तीला घडविण्याचे कार्य करते. इतरांशी येणार्या संपर्कातून व होणार्या विनिमयातून इतरांचे विचार, भावना ग्रहण केले जातात. नवनवे विचार भाषेद्वारा आत्मसात केले जातात. भाषा हे कौटुंबिक व सामाजिक व्यवहाराचे साधन आहे. ते यशस्वी व परिणामकारकरीतीने हाताळता येण्यासाठी एक साधनीभूत विषय म्हणून श्रवण, वाचन, संभाषण, भाषणे, लेखन ही कौशल्ये विकसित व्हायला हवीत. भाषेची प्राथमिक कौशल्ये आत्मसात झाल्यावर व्यक्तीचा सामुदायिक व सांस्कृतिक जीवनाच्या अंगाने विकास होतो.