युद्धाचे वैचारिक पैलू
युद्ध ही नावीन्याची गोष्ट नाही. कारण, मानवी इतिहासाची पाने युद्धाच्या घटनांनी भरलेली आहे. मानवी इतिहासातील युद्धविरहित असा कोणताही कालखंड नाही. त्यामुळे युद्ध हा सर्वकालीन, विश्वव्यापी, चिरंजीव असा विषय आहे. युद्ध कधीही स्वीकारार्ह वाटत नसले, तरी ती एक सामाजिक गरज आहे, हे मात्र नाकारता येत नाही. युद्धाचा आरंभ अन्यायातून होतो. अन्यायाच्या प्रतिकारासाठी हक्कांच्या रक्षणासाठी युद्ध झाल्याचा इतिहास आहे. आंतरराष्ट्रीय वाद मिटविण्यासाठी साम-दाम व भेदनीतीचा वापर करूनदेखील वाद मिटत नसेल, तर दंडनीतीचा म्हणजे युद्धनीतीचा वापर करणे आवश्यक ठरते. ‘तुम्हांस शांतता हवी असेल तर युद्धाला समजून घ्या,’ हे लिडील हार्टचे म्हणणे त्याने केलेल्या मानवी स्वभावाचे अभ्यासाचे परिपाक आहे. सावलीचे महत्त्व उन्हाशिवाय किंवा प्रकाशाची आवश्यकता अंधाराशिवाय स्पष्ट होत नाही; त्याचप्रमाणे खरी शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध समजून घेणे आवश्यक आहे.