धुळे जिल्ह्यातील भिल्ल आदिवासी
महाराष्ट्रातही आदिवासींची छोटी छोटी राज्ये होती. काही जमीनदारही होते. ब्रिटिशांनी त्यांचे हक्क काढून घेतल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. खान्देशातही स्वयंभू व स्वतंत्र भिल्ल राजांना ब्रिटिशांचा हस्तक्षेप सहन झाला नाही. त्यातून भिल्लांनी इंग्रजांविरोधात सशस्त्र उठाव केले. अशाच स्वतंत्र, स्वाभिमानी जमातीवर लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. अशा आदिवासी गटातील एक जमात म्हणजे भिल्ल आदिवासी होत. ‘भिल्ल’ या शब्दाच्या उत्पत्तीविषयी असे सांगितले जाते की, द्रविड भाषेत धनुष्यबाणाला ‘बिल’ असे म्हटले आहे. पूर्वीच्या काळी जो धनुष्यबाण वापरत असे, त्यालाच ‘बिल’ असे म्हणत. त्यांच्या समूहाला ‘बिलसमूह’ म्हणून ओळखले जाई. पुढे याच ‘बिल’ या शब्दाचा अपभ्रंश ‘भिल’ (भिल्ल) असा झाला. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात व शहरात भिल्लांची वस्ती कमी-अधिक प्रमाणात आढळून येते.