नागरी भूगोल
औद्योगिक क्रांतीनंतर औद्योगिकीकरण आणि शहरीकरण ह्यांच्यामध्ये वाढ होत गेली. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण हे सातत्याने वाढत गेलेले आढळते. तसेच वाढत्या औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यांचे विपरीत परिणामसुद्धा अनुभवायला मिळत आहेत. सध्या लोकसंख्येच्या वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. मानवाचे जीवन घड्याळाच्या काट्यावर चालू लागले आहे. ह्या सगळ्याचा विश्लेषणात्मक आणि समस्याप्रधान अभ्यास आवश्यक आहे जो नागरी भूगोलाच्या मदतीने केला जातो. भूगोलाचा अभ्यास जगामध्ये दीर्घ काळापासून केला जात असला तरी नागरी भूगोलाचा अभ्यास विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झालेला आढळतो. परंतु नागरी भूगोलाच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने अधिक चालना विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मिळालेली दिसून येते. त्याच काळात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढल्याचे लक्षात येते.