अहिराणी शब्दकोश
अहिराणी शब्दकोशाची मांडणी अत्यंत साधी, सोपी आहे. मुळात बोलीभाषेचे संवर्धन आणि जतन करणे व नव्या पिढीला बोलीची ओळख करून देणे हे मुख्य कार्य आहे. शब्दकोशात व्याकरणाच्या अंगाने विचार केलेला नाही कारण हे पूर्णतः विद्यार्थ्यांचे कार्य आहे. व्याकरणाच्या क्लिष्टतेत जाण्यापेक्षा बोलीची ओळख, जतन, संवर्धन, करणे हा मुख्य हेतू होता. तसेच समाजात बोलीचा वापर संपर्क व्यवहारामध्ये वाढविला पाहिजे, समाजात, कुटुंबात आणि अनौपचारिक प्रसंगात बोलीतून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे त्यातून बोलीविषयीची अस्मिता जागृत करणे आणि भाषिक न्यूनगंड कमी करणे या शुद्ध जाणिवेतून हा प्रकल्प सिद्धिस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अक्षर क्रमानुसार अहिराणी शब्द व त्याचा मराठी भाषेतील अर्थ दिला आहे. जेणेकरून सहज लोकांपर्यंत हे काम पोहचेल व त्यांना त्याचा उपयोग होईल. शेवटी परिशिष्टात काही प्रातिनिधिक स्वरूपातील काही अहिराणी म्हणी व मराठीत अर्थ दिला आहे.