सावित्रीबाई फुले यांचे साहित्य आणि समीक्षा
सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याचे मूल्यमापन करताना काही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष वेधावे लागते. अत्यंत विपरीत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी केलेली कामगिरी ही नेत्रदिपकअशीच होती. पवार ना. ग. म्हणतात की, “दिर्घकाळपर्यंत अध्यापिका व प्रशिक्षित मुख्याध्यापक म्हणून त्यांची सेवा भारताच्या शिक्षणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्याच्या योग्यतेची आहे.” एवढेच काय स्वतः जोतिरावांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्त्व सांगतांना हंटर कमिशनला सादर केलेल्या निवेदनात कबुली दिली आहे की, त्यांनी अध्यापक म्हणून ९-१० वर्षेच सेवा केली आहे. त्यामानाने सावित्रीबाईंची अध्यापनविषयक सेवा प्रदीर्घ काळ झालेली शिक्षणक्षेत्रातील सेवा होय. यावरून सावित्रीबाईंच्या शिक्षणविषयक कार्याचे मूल्यमापन करता येते.