जनसंज्ञापन माध्यमे आणि संस्कृती
‘जनसंज्ञापन : माध्यमे आणि संस्कृती’ हे पुस्तक जनसंज्ञापनाचे विविध पैलू उलगडणारे आहे. जनसंज्ञापन माध्यम म्हणजे ‘जनमाध्यम’ या विषयीच्या संकल्पना विस्ताराने यात नमूद करण्यात आल्या आहेत. जनमाध्यम म्हणजे आजची प्रसार माध्यमे होय. यात वृत्तपत्रे, रेडिओ, टी.व्ही., इंटनरनेटचा समावेश होतो. प्रसार माध्यमे वेळोवेळी जनसमुहाला वेगवेगळ्या विचारांचे खाद्य पुरवितात. हे खाद्य सकस आहे की, निरूपयोगी आहे याचा बहुदा सामान्य व्यक्ती विचार करीत नाही. तो मनोरंजन म्हणून माध्यम संपर्कात असतो. मात्र नकळत त्याच्या मनावर आणि बुद्धीवर माध्यमेताबा मिळवितात. व्यक्तीची विचारशक्ती, तर्कबुद्धी नियंत्रीत करण्यात अनेकदा माध्यमे यशस्वी ठरली आहेत. विविध जाहिराती, प्रचारसभेतील विविध घोषणा किंवा नाटके/चित्रपटातील पात्रे, आपणास खरे वाटायला लागतात. त्याप्रमाणे कृती केली जाते. ते सर्व स्वीकारले जाते. असे का होते ? यामागे माध्यमांची कोणती गुप्तयंत्रणा काम करीत असते, याचे विवेचन प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे.