माध्यमांचा अन्वयार्थ - माध्यम, पत्रकारिता आणि अंतर्भूत
माध्यमांच्या आजच्या युगात माध्यम म्हणजे काय याचा उलगडा करून सांगण्याची गरज फारशी उरलेली नाही. नागरी जीवन तर माध्यमांनी पूर्णपणे व्यापले आहेच; परंतु ग्रामीण जीवन, जे माध्यम विश्वापासून दूर होते ते देखील आज दूरचित्रवाणी, जाहिरात, भ्रमणध्वनी, दूरध्वनी व अन्य संवाद-माध्यमांपासून अस्पर्श उरलेले नाही. एकेकाळी केवळ दवंडी, लोककला, चावडी, रेडिओ, अशा माध्यमांपर्यंत मर्यादित असलेले ग्रामीण जीवनदेखील संवाद-माध्यमांच्या नवतंत्रज्ञानाने नागरी माध्यमविश्वाचाच कधीचेच भाग करून सोडले आहे.
'माध्यम' या शब्दाचा स्वीकार Medium व Media या दोन्ही इंग्रजी शब्दांचा पर्याय म्हणून आपण मराठीत आज प्रामुख्याने केला आहे. इंग्रजीत 'मीडियम' हा एकवचनी तर 'मीडिया' हा अनेक माध्यमांचा समूह तसेच माध्यमसंबद्ध व्यवहार या अर्थाने वापरला जाणारा अनेकवचनी शब्द आहे. भाषा हे साहित्याचे, रेखा, रंग हे चित्रकलेचे, कॅमेरा हे छायाचित्रणाचे, देहबोली हे अभिनयाचे माध्यम असे म्हणण्याऐवजी एकूणच संवादाची माध्यमे, Communication Media,या अर्थाने आपण 'माध्यम' या शब्दाचा वापर गेल्या काही दशकात अधिक वाढवला आहे.