संशोधन पद्धती
संशोधन ही मानवाच्या कल्पनेपेक्षा बुद्धितत्त्वाला प्राधान्य देणारी अभिक्रिया आहे. कारण, या अभिक्रियेने संपूर्ण मानवी जीवन व्यापले आहे. शोधनाच्या प्रक्रियेनंतर संशोधनाची अभिक्रिया सुरू होते. म्हणून संशोधन क्षेत्रही एकसारखे असेलच असे नाही. जेथे-जेथे मानवी बुद्धी झेपावते, तेथे-तेथे त्याला प्रश्न पडतात. त्याचे कुतूहल जागले जाते. काही मूलभूत अशा जीवनव्यवहारातील समस्या त्याला जाणवू लागतात. त्यातूनच शोधनाला सुरुवात होते. संशोधकास सामग्रीचे आलोचन करताना वस्तुनिष्ठतेवर श्रद्धा ठेवून साधनांचे विश्लेषण करावे लागते. सत्याच्या आकलनाची प्रक्रिया ही परिश्रमपूर्वक अध्ययनातून स्पष्ट होते. यासंदर्भात लॅरॉबी यांनी म्हटले आहे, “सत्य हे केवळ आपल्या स्वतःसाठीच नव्हे; तर सर्वांसाठी सत्य असते यावर शास्त्रज्ञांची दृढ श्रद्धा असते. त्यामुळे शास्रज्ञास निर्णय घेताना आत्मनिष्ठा व वैयक्तिक अशा दोन्ही बाजू दूर सारता आल्या पाहिजे. वस्तुनिष्ठता हे शास्त्रज्ञाचे एक श्रद्धास्थान असले पाहिजे.” फेलिक्स कॉफमन यांच्या मते, “विधानांचे प्रामाण्य सिद्ध होण्याइतकेच त्यांची प्रमेयता सिद्ध होणे हेही संशोधनाच्या प्रगतीसाठी उपकारक आहे.”