महाराष्ट्रातील लोहार समाज - स्थिती व वस्तुस्थिती एक दृष्टिक्षेप
आदिम काळापासून मानवी विकासात व समाज व्यवस्थेत अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देणारा कष्टाळू व प्रामाणिक लोहार, समाजाची आजच्या भांडवलीकरण, औद्योगिकीकरणामुळे झालेली अधोगती व दुरावस्था, अशा या समाजाकडे समाजधुरीणांकडून व समाज व्यवस्थेकडून झालेले अक्षम्य दुर्लक्ष, याबाबत लेखक श्री. विजयराव दामोदर रुम यांनी यथार्थ मांडणी केलेली आहे. आजच्या समाजस्थितीविषयी आकडेवारीसह केलेले सामाजिक विश्लेषण मनाला अस्वस्थ करणारे आहे. याबरोबरच लोहार समाजातील कर्ते स्त्री-पुरुष ही या समाजाला सावरण्यासाठी, सुधारण्यासाठी योग्य प्रयत्न करीत नसल्याची खंत व्यक्त करुन, लोहार समाज चळवळीच्या यशापयशाचे समर्पक वर्णनही पुस्तकात केलेले आहे. समाज चळवळीतील कार्यकर्ते, नेते व सल्लागार यांच्या कर्तबगारीवर शाब्बासकीची थाप देत, काही ठिकाणी त्यांच्यावर मार्मीकपणे टीका करुन चळवळ निकोप व सदृढपणे चालण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. काही विषय, प्रसंग व आशयाच्या संदर्भात व्यंगचित्रे रेखाटून, आपला विचार अधिक प्रभावी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहेे. एकंदरीत समाजाचे वास्तव चित्र उभे करुन लेखकाने समाजातील सर्वांना समाज उन्नतीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी अत्यंत कळकळीने साद घातली आहे.