दखल यावल तालुक्यातील सेनानी व त्यागींची
सिंधू संस्कृतीच्या काळात सांस्कृतिक, सामाजिक घटकांबरोबरच राजकीय आर्थिकदृष्ट्या भारत समृद्ध देश तसेच विकासाच्या दृष्टीने विकसनशील देश म्हणून ओळखला जात होता. जैव विविधता, आर्थिक संपन्नतेच्या हव्यासापोटी भारतावर आर्य, शक, हुण, कुशाण, मुस्लीम तसेच डच पोर्तुगिज, इंग्रज, फ्रेंच इ. देशातील लोकांनी आक्रमण करून येथील साधन संपत्ती स्वतःच्या देशात नेली. इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करुन या देशातील संपत्ती इंग्लंडला नेली. त्यामुळे त्यांचा देश सधन झाला तर भारत देशाला कंगाल करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हे सारे दूर करण्यासाठी पुढे इंग्रजांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर बंड होऊ लागले. त्या बंडाचे निशाण भारतातील मोठमोठ्या शहरांपासून पुढे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर सारख्या ग्रामीण भागातील खेड्यांपर्यंत येऊन पोहचले होते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात यावल तालुक्यातील असंख्य लोकांनी आपल्या त्यागाने, निस्सीम राष्ट्रभक्तीने आणि जाज्वल देशाभिमानाने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. या भागातील स्वातंत्र्यसैनिक, सेनानी या सर्वांचा इतिहास शब्दबध्द करून तालुकावासियांना याची माहिती व्हावी या उदात्त हेतूने सदरील लेखण पुस्तक रुपाने करण्याचा छोटासा प्रयत्न लेखकांनी केला आहे.