मार्क्सवाद
आपण ज्या जगात जीवन कंठीत आहोत, ते जग तिसर्या सहस्त्रकात पदार्पण करते झाले आहे. हे जग आशेवर आधारलेले आहे. कारण, संस्कृतीच्या आणखी विकासाची आजच्या इतकी सुसज्जता पूर्वी कधीही नव्हती; पण हेच जग धोके, विसंगती आणि समस्यांनी भरलेले आहे. त्यामुळे इतिहासातील कदाचित हा अतिशय भयसूचक काळ असावा, असा विचार मनात सतत येतो. जगातील साधन-संपत्ती ही समस्त मानवजातीच्या मालकीचा ठेवा आहे, असे समजून तिचा विवेकनिष्ठेने वापर करायला भाग पाडील, अशा आंतरराष्ट्रीय पद्धती व सभ्यता निर्माण करण्याची गरज आहे. मार्क्सवादी म्हणतात की, विद्यमान परिस्थितीत आगेकूच (विकासाकडे) करण्याचा मार्ग म्हणजे सर्व राष्ट्रांची खरी मानवी, भौतिक आणि आत्मिक जीवनपद्धती निर्माण करणे, आपली पृथ्वी राहण्याजोगी (वास्तव्य) राहील, याची दक्षता घेणे आणि पृथ्वीवरील सर्व संपदेचे प्रमाणशीर वाटप करणे.