भारतीय संविधानाची ओळख
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्याशाखांच्या पदवीस्तरावरील प्रथम वर्गांना भारतीय संविधान हा विषय अभ्यासणे आवश्यक केलेले आहे. म्हणून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन, तसेच भविष्यातील भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांमधून जबाबदार नागरिक घडावा, हा हेतू समोर ठेवून 'भारतीय संविधानाची ओळख' या संदर्भग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय संविधानावर कार्यरत असणारी भारतीय राजकीय व्यवस्था विद्यार्थ्यांना साध्या, सोप्या भाषेत समजावून देण्याचा प्रयत्न या संदर्भग्रंथाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या संदर्भग्रंथामध्ये भारतीय संविधान निर्मितीची पार्श्वभूमी आणि प्रक्रिया, भारतीय संविधानाचा सरनामा, भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय नागरिकत्वासंबंधीच्या संविधानात्मक तरतुदी, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, संविधानिक जागृती दिन, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा, घटनादुरुस्तीची प्रक्रिया आणि अलीकडील काळात झालेल्या महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या या प्रमुख घटकांवर प्रस्तुत संदर्भग्रंथामध्ये अलीकडील काळातील उदाहरणे देऊन प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रस्तुत संदर्भग्रंथाची निर्मिती करताना विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर वर्गांना, तसेच लोकसेवा आयोगाच्या विविध स्तरांवरील परीक्षांसाठी आणि नेट-सेटसह स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व अभ्यासकांना हा संदर्भग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.