छोडो भारत आंदोलन (नाशिक जिल्हा विशेष संदर्भ)
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील 'छोडो भारत पर्व' हे भारतीय जनतेने स्वातंत्र्यप्राप्तीच्या दिशेने टाकलेले अंतिम व निर्णायक असे पाऊल. याअगोदर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या अनेक लहान-मोठ्या चळवळींचा आणि मवाळ, जहाल व क्रांतिकारी अशा अनेक मार्गांचा सार-समन्वय या आंदोलनातून दिसून आला. या सर्व सार समन्वयामागे स्वातंत्र्यप्राप्ती हाच एकमेव उद्देश होता. त्यासाठीच देशभरातील अनेक देशभक्तांनी दीर्घकाळ सुरू असलेल्या या संघर्षाला स्वातंत्र्यप्राप्तीद्वारे पूर्णविराम देण्याचा प्राणांतिक प्रयत्न केला; ज्याची फलश्रुती आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य ठरले.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या या प्रयत्नांतील क्रांतिपर्व ठरलेले छोडो भारत आंदोलन नाशिक जिल्ह्याच्या स्थानिक पातळीवर राष्ट्रीय घटनांच्या क्रिया- प्रतिक्रियांचे आकलन करून, तसेच समाजातील सर्वसामान्य समाजघटकांना केंद्रभूत मानून, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेऊन समग्र व संदर्भासह चित्रण करण्याचा प्रस्तुत ग्रंथ माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. हा ग्रंथ नाशिक जिल्ह्याच्या स्थानिक इतिहासामध्ये, विशेषतः स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासामध्ये भर घालणारा असल्यामुळे इतिहास अभ्यासक, संशोधक व सुज्ञ वाचक या ग्रंथाचे निश्चितच स्वागत करतील, अशी आशा आहे.
- डॉ. संतोष दत्तात्रय बोडके