अव्यक्त : एक पाऊल स्त्री - पुरुष समानतेकडे
कौटुंबिक हिंसा हा समाजाचा एक अंतरिक भाग असला तरी ही एक समस्या आहे. आता मात्र या समस्येने सामाजिक समस्येचे रूप धारण केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महिलांसाठी निगडीत असलेली हिंसा एक गंभीर समस्या आहे. परंतु भारतात पुरुषांविरोधात घडणार्या हिंसेचे प्रमाणही हळुहळु वाढत आहे.
बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे कुटुंब, कुटुंबव्यवस्था व कौटुंबिक जबाबदार्या व भूमिका यातही बदल झाला व तो दिवसागणिक बदलतच चालला आहे. या बदलांशी जुळवून घेतांना काही कौटुंबिक व सामाजिक प्रश्न उदयाला आले. त्यातले काही प्रश्न उघडपणे व्यक्त केले जातात तर काही प्रश्न अजूनही अव्यक्तच राहतात. महिलांवर होणार्या हिंसाचार्याच्या तुलनेत पुरुषांवर होणारे हिंसाचाराचे प्रमाण कमी असले तरी जगभरात व भारतातही हे प्रमाण वाढत चालले आहे. सामान्यतः पुरुष ही संज्ञा पुरुषत्व दाखवणारी कुवत, ताकद, सहनशील इ. गोष्टींनी अधोरेखीत होते. जर पुरुषाने स्वतःवर झालेल्या अत्याचाराविषयी वाच्यता केली तर ती शरमेची बाब किंवा बायकी लक्षण मानले जाते. त्यामुळे पुरुष व्यक्त होणे कमीपणाचे समजतो व अव्यक्तच राहतो.