शिक्षण समृद्धी
शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचे, विकासाचे प्रमुख महत्त्वाचे साधन आहे. त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे, जागरूकपणे पाहून अपेक्षित बदल समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणार्या शालेय शिक्षणाच्या बदलाची देशाला गरज आहे. कालानुरूप नवीन विषय, नवे अभ्यासक्रम, आवश्यक साधनसुविधा, नव्या अभ्यासपद्धती यांना प्राधान्य देऊन त्यांच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे हे एक आव्हान आहे. कारण बदल स्वीकारणे सहजरीत्या घडत नाही. असे बदल घडवताना अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. शिक्षण क्षेत्रातील बदलांची गती खूप कमी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विविध विषयांमधून शिक्षणाचे बदल आणि महत्त्व पटवून दिले आहे. मुलांना ऑनलाइन माध्यमातून व्यवस्थापित पद्धतीने शिकण्याची संधी दिली, तर ते तणावाशिवाय आवडीने शिकू शकतात. ही अभिनव पद्धत आपण पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमासह स्वीकारून नवीन बदल मान्य केला. कमी वेळात आकर्षक सुविधांसह शिकवण्याची व्यवस्था केली, तर या तंत्रज्ञानावर आधारित अध्यापनाचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांना घेता येईल. अशा विविध विषय लेखनाची विविधता या ग्रंथात आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील बदललेल्या शिक्षणाचा लेखाजोखाही लेखांत बघावयास मिळतो.