अमृत महोत्सवी भारत : दृष्टिक्षेप
प्राचार्य डॉ. प्रमोद पवार सरांच्या सेवापूर्तीनिमित्त प्रकाशित ग्रंथाचे शीर्षक ‘अमृत महोत्सवी भारत : दृष्टिक्षेप’ हे असावे, असा माझा आग्रह होता. त्यानिमित्ताने भारताची पंच्याहत्तर वर्षांची सर्वस्पर्शी वाटचाल तपासता यावी हा त्यामागील हेतू होता. परंतु प्राचार्य प्रमोदसर आणि त्यांचे कार्य राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषय परिवाराशी निगडित असल्यामुळे त्यात प्रकाशित झालेले लेख बहुतांशी भारतीय संविधान, राजकारण आणि राजकीय प्रक्रिया यावर भर देणारे दिसून येते. त्यात संविधानातील तरतुदी राजकीय प्रक्रिया, पंच्याहत्तर वर्षातील राजकीय घडामोडी, राष्ट्रपती, पंतप्रधान, घटकराज्य संस्था, परराष्ट्र धोरण, शिक्षण, स्त्रियांचे प्रश्न, दहशतवाद, आदिवासींच्या समस्या, प्रसार माध्यमे, राजकीय पक्ष, जी-२०, पक्षीय राजकारण आणि निवडणूक इत्यादी उपविषयांशी निगडित राहिले. त्यात सामाजिक चळवळी, आर्थिक धोरण, पंचवार्षिक योजना, देशावर आलेली अरिष्ट्ये, १९९० नंतर झालेल्या उलथापालथी, संमिश्र सरकारे, देशाची अस्थिर अर्थव्यवस्था, जागतिक पर्यावरणाचा प्रभाव, १९१४ नंतर राजकीय पटलावर घडून आलेले बदल हे महत्त्वपूर्ण विषय अनोल्लेखित राहिले अर्थात ‘अमृत महोत्सवी भारत’ हा एक मोठा विस्तारित परिप्रेक्ष असलेला विषय असल्यामुळे त्याला एक ग्रंथरूपी गवसणीत सामावणे अशक्यप्राय गोष्ट आहे. वेळेची मर्यादा, लिखाणासंदर्भात असलेली उदासीनता इत्यादी कारणांमुळे ह्या अपूर्णता दिसून येतात. संपादित केलेल्या ग्रंथाची ती मर्यादा असते. त्यात क्रमबद्धता, विषय, आशय याची नीटपणे मांडणी करता येत नाही. प्रा. डॉ. सुनील नेवे होतकरू, क्रियाशील, विद्यार्थी, प्राध्यापक, संपादक म्हणून अल्पावधीत या ग्रंथाची निर्मिती करण्यात यशस्वी ठरला.