आदिवासी समाज, संस्कृती, साहित्य आणि भाषा
ग्रंथाची मांडणी करताना लेखकाने दोन भागात केलेली विभागणी वाचकांच्या आकलनासाठी अत्यंत सोईची वाटते. 'आदिवासी समाज आणि संस्कृती' या पहिल्या विभागात... आदिवासी समाजसमूहांमधील विविध जमाती आणि त्यांची वैशिष्ट्ये लेखकाने बारकाईने मांडली आहेत. या मांडणीतून लेखकाने प्रत्यक्ष केलेल्या अभ्यासाची खोली दिसून येते. या पहिल्या विभागात सामाजिक, शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन जीवनमूल्यांची विस्तृत चर्चा केली आहे.
...ग्रंथाच्या उत्तरार्धात डॉ. सुलतान पवार यांनी आदिवासी साहित्याचा विस्तृत धांडोळा घेतलेला पहायला मिळतो. आदिवासी साहित्याची संकल्पना स्पष्ट करताना... आदिवासी जाणीवेने आदिवासी जीवनावर लिहिलेल्या साहित्यातून 'आदिवासी साहित्य' ही संकल्पना उदयास आली, असेही डॉ. पवार म्हणतात. त्याबाबत त्यांनी केलेले स्पष्टीकरणही स्वागतार्ह आहे. पुढे लेखकाने आदिवासी कादंबरी, कथा, नाटक, कविता या साहित्यप्रकारांची कालानुक्रमे सविस्तर चर्चा केली आहे. आदिवासी साहित्याच्या प्रेरणा, साहित्यातील जीवनजाणिवा, आशय, मांडणी, शब्दयोजन या सर्वच घटकांची विस्तृत आणि उदाहरणांसहित केलेली चर्चा या ग्रंथाचा गुणात्मक दर्जा वाढविणारी आहे. या ग्रंथाच्या 'आदिवासी बोलीभाषांची वास्तवस्थिती आणि भवितव्य' शेवटच्या प्रकरणाविषयी... 'खाउजा' संस्कृतीचा अतिरेक भाषांच्या हासाला कसा कारणीभूत आहे, याची सद्यस्थिती लेखकाने मांडली आहे. आदिवासी समाज आणि साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना डॉ. पवार यांनी लिहिलेल्या या ग्रंथाकडे कानाडोळा करून पुढे जाणे शक्य होणार नाही. आदिवासी साहित्य, लोकसंस्कृती आणि आदिम मानवी समूहाच्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयोगी ठरणारा आहे.