महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती वास्तव
मी सेवानिवृत्तीनंतर अनुसूचित जमातीतील वंचीत जमाती कोळी ढोर टोकरे कोळी, कोलघा या कोलछा आणि मल्हार कोळी यांच्यावर लक्ष केंद्रीत केले. बरेचसे कागदपत्रे गोळा करतांना बराच कालावधी निघून गेला. याचं कालावधीत माझ्या हाती अशी काही कागदपत्रे लागलीत की त्यामुळे माझी अशी पक्की धारणा झाली की, महाराष्ट्र राज्यात आदिवासी आणि अनुसूचित जमाती असा काहीसा भेदाभेद आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीत असलेल्या बऱ्याचश्या जमाती यांच्या घटनादत्त अधिकारापासून वंचित राहत आहेत आणि विशेष म्हणजे ज्या जमातींवर हा अन्याय होत आहे त्या देखील या वास्तवापासून खूप लांब आहेत. खान्देशचा विचार करता या जिल्ह्यात या दोन जमाती प्रमुख असून शासकीय प्रकाशनातील चूकीच्या लेखनामुळे तसेच अर्धवट व पुर्वग्रह दूषीत शासन निर्णयामुळे या जमातींसह असंख्य जमातींवर अन्याय झालेला आहे. आपल्या लेखनातून समाजाला दिशा मिळायला पाहिजे, दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळायला पाहिजे, या शुद्ध हेतूने सदर पुस्तक लिहिले गेलेले आहे. या पुस्तकात कोणत्याही जमातींवर न्यायाच्या दृष्टीने अन्याय होणार नाही व प्रत्येक जमातीला दिशा दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे.