उपयोजित संख्याशास्त्र
आधुनिक व संगणकाच्या वेगवान युगात मानवाचे जीवन खूपच व्यापक व गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यामुळे सांख्यिकीचे क्षेत्रही खूपच विस्तारीत होत चालले आहे. आज शेती, उद्योग, व्यापार, वाणिज्य, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र व्यवस्थापनशास्त्र व वाहतूक या सारख्या सर्वच क्षेत्राच्या अध्यापनासाठी सांख्यिकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. सांख्यिकी हे सर्व शास्त्रात संशोधनाचे व अनिश्चित परिस्थितीत निर्णय घेण्याचे अत्यंत प्रभावी साधन असल्याने सांख्यिकीचा उपयोग बहुतेक सर्वच शास्त्रात केला जातो. आर्थिक नियोजन तर सांख्यिकी शिवाय अशक्य आहे. म्हणून सांख्यिकीला आर्थिक नियोजनाची चाके म्हटले जाते. आधुनिक काळात सांख्यिकी तंत्रावर आधारित अनेक नवनवीन सॉफ्टवेअर पॅकेजेस उपलब्ध झाले आहेत व होत आहे. म्हणून सांख्यिकीचे महत्व व उपयोगिता याबाबत वॉलिस आणि रॉबर्ट्स यांनी आधुनिक सांख्यिकीला ‘मानवी कल्याणाचे गणित’ असे म्हटले. म्हणून सांख्यिकीय अभ्यासाचे वाढते महत्त्व व बदलत्या काळात नवीन संकल्पना व बदलते प्रवाह लक्षात घेता ग्रंथाची निर्मिती विस्तृत व व्यापक स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न सदर ग्रंथात करण्यात आला आहे.