आंतरराष्ट्रीय सुरक्षा समस्या
राष्ट्र-राज्याच्या संकल्पनेचा उदय झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय राजनीती व पर्यायाने आंतरराष्ट्रीय सुरक्षेमध्ये क्लिष्टता आली. पुढे औद्योगिक क्रांती, व्यापार उन्मेष, दळणवळण व संचारसाधनांमध्ये झालेल्या विकासामुळे सुरक्षेचा संबंध आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेला. त्यानुसार सुरक्षेच्या धोरणांची आखणी करण्यात येऊ लागली. सध्याचे जग परस्परांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. विविध राष्ट्रे आणि त्यांचे नागरिक यांचे परस्परसंबंध व संवाद व्यापक स्वरूपात वाढला. सुरक्षा संकल्पनेची व्याप्ती वाढून ती सर्वसामान्य नागरिकांशी अधिक संबंधित झाली. सध्याच्या काळातील धोक्यांना राष्ट्रीय सीमांची बंधने राहिली नाहीत. आंतरराष्ट्रीय धोक्यांमध्ये गरिबी, संसर्गजन्य आजार, पर्यावरण र्हास, आंतरराज्य संघर्ष, यादवी युद्ध, वांशिक नरसंहार, आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी व दहशतवाद यांचा अंतर्भाव होतो. या धोक्यांना सामोरे जाताना आंतरराष्ट्रीय पातळीवरच एकत्रितपणे लढा देणे गरजेचे आहे. ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना अधिक विकसित करण्यास कारणीभूत ठरली. प्रस्तुत ग्रंथ हा विद्यार्थी, अभ्यासक तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही.