शैक्षणिक संशोधन प्रस्ताव लेखन
संशोधक म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर चेहर्यावर मोठा चष्मा चढवून प्रयोगशाळेत अहोरात्र प्रयोग करणारी व्यक्ती समोर येते; परंतु संशोधन हे फक्त प्रयोगशाळेतच केले जाते, असे नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संशोधन केले जाते. मानवाने आज जी देदीप्यमान प्रगती केलेली आहे, ती केवळ संशोधनाच्या आधारावरच. जेव्हा सर्वसामान्य विद्यार्थ्याला किंवा विविध क्षेत्रांत कार्य करणार्या व्यक्तींना संशोधन म्हणजे काय? हे जाणून घ्यावयाचे असते किंवा स्वतः संशोधन करावयाचे असते, तेव्हा किंवा शैक्षणिक पात्रता उंचावण्यासाठी एम. फिल किंवा पीएच. डी.ची पदवी संपादन करण्याची आवश्यकता असतेतेव्हा त्यास संशोधनाकडे वळावे लागते; परंतु संशोधन कसे करावे? समस्या कशी निवडावी? याबाबत अनेक प्रश्न मनात उद्भवतात. या प्रश्नांचे समाधान शोधण्यासाठी संशोधन कार्यवाहीचे टप्पे याबाबत सविस्तर माहिती करून घेण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी संबंधित व्यक्ती मार्गक्रमण करीत असते. समस्या सोडविण्यासाठी विशिष्ट क्रमानेच जावे लागते; परंतु बर्याच वेळेला मार्गदर्शनाच्या अभावामुळे समस्या सोडवावी कशी? ही मोठी समस्या निर्माण होते. अशाच प्रत्येकाच्या मनातील संशोधन समस्येचे समाधान मिळविण्यासाठी त्या पायर्यांनी जावे लागते. त्याबाबत सविस्तर माहिती या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे एक दीपस्तंभासारखे हे पुस्तक सर्व संशोधन करणार्यांना उपयोगी पडेल.