परिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि प्रबोधन
आयु. सुरेश साबळे हे नाव महाराष्ट्राला आज अपरिचित नाही. कवी, समीक्षक, चिंतनशील लेखक व आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या आधीच्या लेखनप्रपंचात मोलाची भर घालणारा हा एक ग्रंथ प्रकाशित होतो आहे, ही आनंदाची बाब आहे.‘परिवर्तनवादी चळवळी : चिंतन आणि प्रबोधन’ असे भरीव शीर्षक असलेला त्यांचा हा ग्रंथ होय. या ग्रंथाचा कालिक पट मांडताना ते म्हणतात, ‘आधुनिक काळातील माणसांची मांडणी महात्मा बुद्धांच्या तत्त्वज्ञानामधून उगम पावते. जोतीराव फुले यांच्या चळवळी मार्गाने पुढे जात तिचे शेवटचे टोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र लढ्यात, चळवळीत येऊन मिळते...’ अशा या व्यापक पटाची विषयानुुगामी मांडणी त्यांनी या ग्रंथात केली आहे. ग्रंथाच्या पहिल्या भागात त्यांनी परिवर्तनवादी विविध चळवळींचा वेध घेतला आहे. हा वेध घेताना त्यांनी बुद्धांपासून तर पार स्त्री, मुस्लीम आणि शिवधर्मालाही स्पर्श केला आहे. दुसर्या विभागात आंबेडकरी प्रेरणेचे कलात्मक विश्वाचे चिंतन केले आहे, तर तिसरा विभाग हा आंबेडकरी विचार ज्यांनी खळाळत्या नदीप्रमाणे प्रवाहित केले, अशा जलसा, परिषदा, वृत्तपत्रे, प्रचार अशा प्रबोधनप्रधान यंत्रणांचा परिचय करून दिला आहे.या ग्रंथातील लेखांची व्याप्ती जरी विस्तृत असली, तरी विस्तार अल्प असल्याचे जाणवते. वास्तवात यातील एक-एक विषय हा एका स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे. केव्हातरी आयु. सुरेश साबळे हे अधिक खोलात जाऊन या लेखांच्या विस्तारात आवरता घेतलेला हात मोकळा सोडून या विषयाची स्वतंत्रपणे मांडणी करतील, ही अपेक्षा करायला हरकत नाही.वैदिकेत्तर व्यवस्था कायम संघर्षरत असूनही आपल्या प्राचीन इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगण्यात अपयशी का ठरते? त्याचा विचार केल्यास वैदिक व्यवस्थेप्रमाणे वैदिकेत्तर चळवळीच्या कार्यकर्तृत्वाच्या नोंदी वा त्याचे दस्ताऐवजीकरण करण्यात वैदिकेत्तर नेहमीच कमी पडतात. परिणामतः वैदिकेत्तर सतत चळवळ करीत असूनही या चळवळींचा इतिहास भावी पिढ्यांना उपलब्ध होत नाही. सुरेश साबळेंनी घेतलेल्या या समकालीन चळवळीच्या नोंदी पुढच्या पिढ्यांसाठी समर्थ इतिहासाची भूमिका पार पाडतील, याविषयी शंका नाही.