आदिवासी संस्कृती : भाषा आणि साहित्य
महाराष्ट्रात मराठी आपली मातृभाषा असली तरी तिच्या उपभाषाही अनेक आहेत. वर्हाडी, कोकणी, अहिराणी भाषेचा वेगवेगळा बाज आहे. मराठवाड्यात मराठीची धाटणी वेगळीच आहे. पश्चिम महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात आणखी वेगळी आहे. अहिराणी तर मराठी, गुजराती, राजस्थानी, हिन्दी भाषेचे संयुक्त मिश्रण आहे. त्या अंगाने भिलोरी, पावरी व अन्य आदिवासी बोलीभाषांमध्ये अनेक भाषांमधून आलेले शब्द आहेत. त्या अंगाने डॉ. पुष्पाताई गावीत यांनी केलेले संशोधन मौलिकच म्हटले पाहिजे. महाराष्ट्रात ४७ आदिवासी जमाती आहेत. त्यांच्या ८० बोलीभाषा अस्तित्वात आहेत. खान्देशातल्या सातपुड्याच्या पट्ट्यात २० बोलीभाषा बोलणार्या १७ जमातींचे वास्तव्य आहे. प्रामुख्याने ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. धुळे-नंदुरबार व जळगावमध्ये भिल्ल, पावरा, मावची, कोकणी अशा जमाती प्रामुख्याने आहेत. ठाण्यात कोकणी, कोकणा, महादेव कोळी तर बुलढाण्यापासून पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गोंड, माडिया गोंड, भिल्ल कोरकू, न्याहल व यासह अनेक उपजमाती आहेत. त्यांची प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषाशैली आहे. त्यात भिलोरी, कोकणी, पावरी, मावची, कोटली, कायली, डांगी, बागलाणी अशा बोलीभाषांचा समावेश आहे. यातील काही भाषा बोलता येत नसल्या, समजत नसल्या तरी बिगर आदिवासी समाजाला माहित आहे. मात्र एवढ्या तपशिलावर माहित नाहीत. डॉ. पुष्पाताई गावीत यांनी त्याबाबत सर्वांच्याच ज्ञानात भर घातली आहे.