आदिवासी साहित्य आणि कला संस्कृती
'आदिवासी साहित्य आणि कला संस्कृती' या संग्रहात साहित्य संस्कृती आणि कला संस्कृतीचा उहापोह केला आहे. खरं तर स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षात आदिवासी साहित्याची सांस्कृतिक चळवळ अतिशय धिम्या गतीने पुढे-पुढे सरकत आहे. आदिवासी साहित्यिकांनी अजूनही आपल्या मुळांचा शोध घेतलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर साहित्याची सखोलपणे चर्चा करणे किंवा साहित्यातील साहित्यबीज शोधणे, त्याचे साहित्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र मांडणे अवघड आहे. परंतु प्रस्थापितांच्या समीक्षा चष्म्यातून का होईना आम्ही आमच्या साहित्य आणि कलांची समीक्षा हाती घेतली आहे. नृत्य, नाट्य, विशेषतः मौखिक साहित्य आणि ललित साहित्यावर भाष्य करू लागले आहे. करणाऱ्यांची संख्या दुर्मिळ आहे. पण त्यांनी जे काही भाष्य केले आहे ते येणाऱ्या पिढीला दिशादर्शक आहे. म्हणूनच या ग्रंथात संस्कृतीवर भाष्य करणाऱ्या काही महत्त्वाच्या लेखांचा समावेश केला आहे.आदिवासींच्या कला ह्या त्यांना निसर्गाकडून मिळालेल्या देणग्या आहेत. त्यात सहजता आहे, सुंदरता आहे. आदिवासींच्या जगण्याची मूल्ये त्या कलांतून सहज डोकावतात. त्या कलांवर अद्यापतरी आदिवासी समीक्षकांनी आदिवासी धारणांच्या नजरेतून पाहिलेले नाही. बोलले, लिहिले नाही. परंतु, जे काही लिहिले जात आहे, ते केवळ सौंदर्याच्या अंगाने. अशा कलासंस्कृतीवर प्रकाश टाकणारे महत्त्वाचे लेख या ग्रंथात समाविष्ट केलेले आहेत.