शस्त्रास्त्रे आणि युद्धविज्ञान
युद्ध इतिहासात शस्त्रास्त्रांना प्रचंड महत्त्व आहे. शस्त्राशिवाय कोणतेही युद्ध आजवर झालेले नाही आणि विजयही संपादन केलेला नाही; परंतु कोणत्याही युद्धाचा अंतिम निर्णय हा त्या शस्त्रास्त्रांच्या कुशलतेने केलेल्या वापरावरच ठरवला जातो. त्यानुषंगाने शस्त्रास्त्रांची निर्मिती व त्यांच्या वापराच्या कुशलतेनुसार युद्धविज्ञान अस्तित्वात आले असावे. विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास जसजसा होत गेला तसतसा शस्त्रास्त्रांचाही विकास होत गेलेला दिसतो. विज्ञानातील शोध हे गरजेपोटी लागले किंबहुना ते मानवाच्या सुरक्षेच्या गरजेतून लागले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आदिमानवापासून आजपर्यंत मानवाने स्वत:चे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी व दुसर्यावर कुरघोडी करण्यासाठी दगडाच्या शस्त्रास्त्रांपासून माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंचा प्रवास केलेला आहे. त्यामध्ये विविध आयुधे व शस्त्रास्त्रे निर्माण केली आहेत. ती शस्त्रास्त्रे वापरून विजय मिळवण्यासाठी विविध डावपेच व युक्त्या वापरल्या आहेत. त्यांचे विवेचन करण्याचा प्रयत्न सदर ग्रंथातील एकूण १२ प्रकरणातून केला आहे.