बौध्दिक संपदा अधिकार
२१ वे शतक हे ज्ञान आधारित प्रगतीचे युग आहे. आज प्रत्येक क्षेत्रात डेटा, माहिती, ज्ञानाचा बोलबाला आहे. आज कृषी, उद्योग, व्यापार, राजकारण, समाजकारण, प्रशासन माहितीच्या आधारावर प्रगती करीत आहे. इप्रिरियल डेटा आणि ओबीसी आरक्षण या विषयावरील केंद्र व राज्य सरकारच्या अडचणीची परिस्थिती आपण पहात आहोत. आर्थिक, सामाजिक विकासासाठी ज्ञानाचा शोध आणि त्याचा विकास करणे, त्यासाठी प्रसार प्रचार करणे आवश्यक आहे. दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास पूर्वी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाच्या जाहिरातीत फक्त पायाभूत सुविधाचा आणि उच्चविद्याभूषीत शिक्षकांचा उल्लेख असायचा. आता मात्र जाहिरातीत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रँकीग, मूल्यमापन ग्रेड, संशोधन केंद्र, कॉपीराईट्स, पेटंट, प्रकाशने यांचा अग्रक्रमाने उल्लेख आढळतो. थोडक्यात आज ज्ञाननिर्मिती, ज्ञान प्रसारण आणि त्याचा आर्थिक फायद्यासाठी वापर जग करत आहे. हे करण्यासाठी त्यांची नोंदणी, बौद्धिक संपदा म्हणून करण्यासाठी करणे आवश्यक आहे.