औद्योगिक अर्थशास्त्र
अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून औद्योगिक क्षेत्र आपले स्थान राखून आहे. खनिज व्यवसाय, कारखानदारी, बांधकाम, वीजनिर्मिती, पाणी व इंधन वायू पुरवठा या सर्वांचा समावेश औद्योगिक क्षेत्रात होतो. हे उत्पादन व व्यवहार करणार्या खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उद्योगसंस्था अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मेजर व मायनरसारख्या सर्व बाबींचा ‘औद्योगिक अर्थशास्त्र’ या ग्रंथात समावेश करुन व्याप्ती व दर्जा भक्कम ठेवला आहे. औद्योगिक अर्थशास्त्र संबंधीचे विवेचन शक्य तितक्या सुलभ पद्धतीने करण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास नसणारे लोक व सामान्य विद्यार्थ्यांनाही या विषयाचे सहज आकलन व्हावे, हा त्यामागील हेतू होय. औद्योगिक अर्थशास्त्राचा अधिक सखोल अभ्यास करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी औद्योगिक परवाना पद्धती, औद्योगिक कायद्याची कलमे, सामान्य माहिती इत्यादी अभ्यासविषय प्रस्तुत ग्रंथात विस्तृत रीतीने हाताळले आहेत. तसेच काही प्रकरणांना प्रगत विश्लेषणाची गरज असेल तसे विश्लेषण दिले आहे. शिक्षक, सामान्य लोक, तसेच अर्थशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.