मराठी विज्ञान साहित्य सूची
मराठीत विज्ञानसाहित्य लिहायला सुरुवात होऊन सुमारे शंभर- सव्वाशे वर्षे झाली. पण तरीही विज्ञानसाहित्याची तपशीलवार सूची आजवर उपलब्ध नव्हती. ही उणीव सागर रघुनाथ सुरवसे यांनी बनवलेल्या 'मराठी विज्ञान साहित्य सूची मुळे भरून निघेल, याची खात्री वाटते. सागर रघुनाथ सुरवसे यांनी कष्टपूर्वक बनवलेल्या या सूचीमध्ये मराठीत आजवर प्रकाशित झालेली विज्ञान कथा-कादंबऱ्यांची सुमारे दोनशे पुस्तके तर आहेतच पण विज्ञान कविता, नाटके, एकांकिका, नभोनाट्ये, कोश, प्रबंध, विज्ञानविषयक लेख यांचाही त्यात अंतर्भाव केला आहे. याखेरीज विज्ञान विषयाला वाहिलेली मराठी नियतकालिके आणि दिवाळीअंक यांचीही यादी दिली आहे. इतर भाषेतून मराठीत अनुवाद झालेल्या पुस्तकांचाही सूचीत समावेश आहे. शिवाय, बालसाहित्याचा स्वतंत्र विभाग आहे. त्यामुळे ही सूची केवळ अभ्यासकांनाच नव्हे तर विज्ञानसाहित्याचे चाहते, संपादक आणि प्रकाशक यांनाही उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.