ऋतुगंध
'ऋतुगंध' या कवितासंग्रहात कवी गजानन कुळकर्णी यांच्या संवेदनशील मनाचा प्रवास आहे. जीवनाच्या सर्व कल्लोळात कवितांनी, गीतांनी मानवी मनाला सावरलं आहे. मराठी भावगीते म्हणजे भावसुगंधाची कुपी. या कविची कविता बरीचशी भावकाव्याच्या वाटेवर चालणारी असून त्यांच्या मनाने भावनांची अनेक क्षितीजे ओलांडली आहेत. भावगीतांचे संस्कार त्यांच्या कवितेवर झालेले आहेत. निसर्गाच्या संगतीने हळूवार भावनांची शिंपण हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. आधुनिकीकरणाच्या युगातही त्यांनी जपलेली निसर्गाची ओल, जीवनावरची निष्ठा आणि माणसावरचे प्रेम हे त्यांच्या कवितेचे बळ आहे. 'ऋतुगंध' या कवितासंग्रहात एकूण पंचावन्न कविता असून आशय आणि विषय यांची विविधता तर आहेच परंतु सध्याच्या समाजजीवनात दुर्मिळ अशी हळूवार प्रीतभावना, संयमित शब्दांतून व्यक्त करणे हे त्यांच्या कवितेचे आगळेपण आहे. या विशुद्ध प्रेमकवितेत 'अवघड भाषेला समज नसून मुकेपणाला समज आहे' हे उपयुक्त सूत्र त्यांनी प्रेमभावना सफल होण्यासाठी सांगितले आहे. आधुनिकीकरणाच्या या रूक्ष जगात कविने निसर्गाच्या सान्निध्यात प्रीतभावना जपण्याचा प्रयत्न केला आहे.
(प्रस्तावनेतून...)