माती मागतेय पेनकिलर
"माती मागतेय पेनकिलर' असे प्रतिकात्मक शीर्षक असलेला हा संग्रह शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव अधोरेखित करतो. या संग्रहातील कवितांचे 'शेती' हे आस्थाकेंद्र आहेच, पण पोस्टमॉडर्न ग्रामीण, मध्यमवर्गीय वाताहतीची एक व्याकूळ कहाणी देखील यात आहे. या कहाणीत माणसांच्या व्यावहारिक जगण्याच्या अनेक भल्याबुऱ्या संहिता सामावल्या आहेत. समकाळाच्या पार्श्वभूमीवर या संहितांचा शोध घेणे अनेकार्थाने महत्वाचे ठरते, कारण यात एका संवेदनशील कवीमनाचा सूक्ष्म प्रक्षोभ आहे. विशेषतः नवी मूल्यव्यवस्था प्रस्थापित होत जाण्याच्या काळात कवीने आत्यांतिक आस्थेने, संवेदनशीलतेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि या तात्विक प्रश्नांचा आपल्याला प्रतिवाद करता येत नाही. बेसुमार भौतिक प्रतिकृतींनी व्यापलेले आणि विविध अस्मितांच्या आकर्षणात गुरफटलेले आजचे हे जग आहे. कवीने वैयक्तिक सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन या जगाचे आंतरिक चित्र आपल्यासमोर ठेवले आहे. हे चित्र जीवनातल्या विसंगतीचे, अंतर्विरोधाचे आणि संभ्रमित भोवतालाचे आहे. म्हणूनच ही कविता वाचताना आपण अंतर्मुख होतो, खिन्न होतो. आपल्या मनात नैराश्याची जाणीव अधिक टोकदार होत जाते. पण हे नैराश्य म्हणजे त्रागा नाही. फ्रस्ट्रेशन नाही. तर आपण सर्वांनीच अपरिहार्यतेने स्वीकारलेल्या अनिश्चित आणि निःसत्त्व काळाची एक निर्णायक आणि माणूसपणाला प्रतिसाद देणारी जाणीव आहे. कृषी जीवनासह समग्र सांस्कृतिक व्यवस्थेवर अत्यंत प्रभावीपणे आणि स्वतःच्या भाषेत भाष्य करणारी ही कविता आपल्याला अंतर्बाह्य व्यापून राहते. कारण या कवितेचे अनुभवक्षेत्र खूप विस्तृत आणि प्रामाणिक आहे.