तुम्ही काहीही म्हणा
संजय हिंगोणेकर यांचा "तुम्ही काहीही म्हणा!" हा कवितासंग्रह म्हणजे समकालीन राजकीय परिस्थितीला दिलेला कलात्मक पण कणखर असा प्रतिसाद आहे. हल्ली कविता म्हणजे नुसताच शब्दांचा पसारा झाली आहे आणि त्यात अर्थ मात्र शोधूनही सापडत नाही. दुसऱ्या बाजूला कवी 'तटस्थ' असावा आणि कवितेने केवळ सूचितार्थाने बोलावे, असेही काहीतरी मानले जाते! संजय हिंगोणेकर यांना अशी तटस्थतेची चैन न परवडणारी वाटते. त्यांची 'ते' आणि 'आम्ही' ही परिभाषा अलीकडे लिहिल्या जाणाऱ्या आत्मकेंद्री आणि गूढ कवितेपेक्षा भिन्नत्व राखून आहे. हिंगोणेकरांची कविता प्रवाहपतित धर्म, राजकारण, सत्ता यांवर नेमक्या शब्दांत प्रभावीपणे भाष्य करते. अल्पाक्षर हे या कवितेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. निष्पाप बाळांच्या मनात धर्माचा द्वेष पेरणे, सत्ता हाती आल्यावर जनतेशी प्रतारणा करणे, जात,धर्म, वर्ग यांच्यावरून भेद करून सत्तेची पोळी भाजून घेणे, या वास्तवावर ही कविता प्रभावीपणे भाष्य करते. सत्तेचे लांगुलचालन करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांचा खोटा बुरखा फाडून लोकशाही सक्षम करण्यासाठी आवाज उठवला पाहिजे, हेच या कवितेतला शब्द-न्-शब्द सांगतो. "अन्यायाच्या विरोधात / आमचे रक्त / सळसळून उठेलच!", ही कवीची भूमिका कवीच्या जबाबदार माणुसपणाची साक्ष देते.
- दिलीप चव्हाण, नांदेड