पऱ्हेड
ग्रामीण, प्रादेशिक आणि वास्तवदर्शी कादंबरी या प्रवाहातले संजीव गिरासे हे अलीकडच्या काळात साहित्यजगताचे लक्ष वेधून घेतलेले खान्देशी नाव आहे. नवा विषय घेऊन लिहिलेली 'पन्हेड' ही कादंबरी प्रादेशिक व समाजशास्त्रीय दृष्ट्या फार महत्त्वाची ठरावी, अशी तिची व्यापकता आहे. प्रादेशिक, सामाजिक आणि दोन धर्मीयांच्या अंतर-रचने बरोबर सांस्कृतिक पर्यावरणावर ही कादंबरी भाष्य करते. हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मातील व्यक्तिरेखा मानवतेच्या पारड्यात सम पातळीवर जगतात. भावनिक माणुसकीचा ओलावा निर्माण करतात. अडचणीच्या काळात स्वधर्माचे पालन करीत इतर धर्माचेही पावित्र्य राखतात. हे या प्रस्तुत कादंबरीचे बलस्थान म्हणायला हवे.
गिरासे यांचे अनुभवविश्व व जीवनाविषयांच्या जाणिवा या कादंबरीतून ठळकपणे अभिव्यक्त झाल्या आहेत. ही कादंबरी प्रादेशिक न राहता व्यापक मानवी भावभावनांना स्पर्श करते. चिंतन, सकारात्मक तथा वैज्ञानिक कसोटींवर उतरणारे प्रागतिक, अंधश्रद्धा व काळाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या श्रद्धांना छेद देणारे विचार आणि जोडीला मानवता धर्म श्रेष्ठ मानणाऱ्या व्यक्तिरेखा या कादंबरीला विशिष्ट उंचीवर घेऊन जातात.
वाचकाला चिंतन प्रवृत्त, कृतीप्रवृत्त आणि आत्मप्रवृत्त करणारा व झपाटून टाकणारा अनुभव आणि समाजचित्रण लेखकाने या कादंबरीतून मांडलेले आहे. कथानक, व्यक्तिरेखा, धार्मिक विचार, आचार, चिंतन, समाज, परंपरा, समाजातील व्यसनाधीनता, अंध विचार, भाषाशैली, निवेदनातील वेगळेपण, बोलीभाषांचा उपयोग या व इतर घटकांचा विचार केला तर ही एक जमून आलेली कलात्मक कादंबरी झाली आहे. समाज वास्तवमानातून स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणारी नायिका, रईसा, जिवंत करणारी 'पन्हेड' ही कथावास्तू रईसाची न राहता समाजाची होते, हे वैशिष्ट्ये इथे नमूद करायला हवे.
• लक्ष्मीकांत देशमुख (प्रस्तावनेतून)