झाड कधीच कुणाच्या मालकीचं नसत
कवी संजय लोहकरे ह्याच प्राचीन आदिम साहित्य परंपरेचे वारसदार आहेत. हजारो वर्षांपासून आदिवासी माणसाच्या मनात गुणगुणणारी लय त्यांच्या कवितेत आहे. त्यांच्या कवितेत आदिवासी अस्मितेचा हुंकार आहे. हुंदकाही आहे. कवी संजय लोहकरे हे आदिम वेदनेचे भाष्यकार आहेत. पांढर्या कागदावर काळ्या अक्षरांचा विलास करणार्या तथाकथित कवींच्या इयत्तेत ते बसत नाहीत. सामाजिक बांधिलकीचे कंगण हाताला बांधून व्यवस्थेशी दोन हात करण्यास निघालेल्या कवितेचे ते धनी आहेत. ते क्रांतिकारी कवितेचे जन्मदाते आहेत. म्हणूनच त्यांच्या कवितेत पित्याचे दायत्व आणि दराराही आहे. कविता लिहिल्याने माणूस कवी होतो या खुळ्या कल्पनेपासून ते कोसोदूर आहेत. ते कविता जगणारे आणि शब्दांची मशाल हातात घेऊन जाणारे कवी आहेत. म्हणून ते आदिमांचे जागतकरू आहेत. संथाली भाषेच्या कवयित्री निर्मला पुतुला त्यांच्या काव्य निर्मितीची भूमिका त्यांच्या एका कवितेत मांडतात. त्या म्हणतात,
यह कविता नही
मेरा एकान्त का प्रवेशद्वार है
मै कविता नही
शब्दो में खुद को रचते देखती हूँ
अपनी काया से बाहर खडी होकर
अपना होना।
कवी संजय लोहकरे निर्मला पुतुल यांच्या वंशावळीतले कवी आहेत.