शब्दराई
अनिवार उत्सुकतेने काव्यसंग्रह चाळायला घ्यावा आणि अपेक्षाभंग व्हावा, अशा या काळात सौ. सुनिता नारखेडे - येवले यांचा काव्यसंग्रह हाती आला. कविता चाळता चाळता केव्हा लक्षपूर्वक वाचायला लागलो अन् हरवून बसलो, हे कळलेच नाही. सर्व कविता प्रसादगुणी आहेत. मुक्तछंदाच्या सुळसुळाटाच्या जमान्यात, या काव्यसंग्रहातील कविता गेय स्वरुपाच्या आहेत हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. मानवी जीवन हे विविध जीवनस्पर्शी असतं. हे नात्यांचे, भावनांचे, विषयांचे विविध पदर यात उलगडलेले आहेत. नव्या दमाचा आश्वासक सूर कवयित्रीला गवसलेला आहे. या कविता भावनेला साद घालणाऱ्या असून बौद्धिक मेजवानीही देतात. एक दर्जेदार काव्यसंग्रह हाती आला म्हणून मन पुलकित झाल्याची अनुभूती वाचकाला येईल.