मराठी लोकरंगभूमी
मराठी लोकरंगभूमीच्या विस्तृत परिप्रेक्ष्यात पारंपरिक लोकनाट्य-रंगभूमीचा परिचय व्हावा. त्याची स्वरूप-वैशिष्ट्ये, प्रकार-प्रवाह, लोकतत्त्व आणि ऐहिक-आध्यात्मिक स्वरूप समजून घ्यावे. लोककला-लोकवाङ्मय आणि सादरीकरणाचे बोलीभाषेतील संप्रेषण-संवादाचा अभ्यास करावा. यादृष्टीने पिढीजात लोकपरंपरेतील मौखिक आणि कृतीशील लोकनाट्याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. लोकायत, आदिम आणि नागर अशा लोकपंरपरांचा लोकसांस्कृतिक वारसा आणि त्यांचे स्तरभेद जाणून घेणे, त्यांच्या पारंपरिक स्वरूपाची लोकमानस आणि लोकसंवादाशी असलेली नाळ समजून घेणे आवश्यक ठरते.
अशा काही उद्दिष्टांसह मर्यादित घटकांचा अभ्यास मध्यवर्ती ठेवून प्रस्तुत ‘मराठी लोकरंगभूमी’ संबंधीत लेखन केले आहे. लोकरंगभूमी संकल्पना व स्वरूप-वैशिष्ट्ये आणि लोकसाहित्य-लोकरंगभूमीचा परस्पर अनुबंध समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. कीर्तन, भारूड, वहीगायन, दशावतार, तमाशा, लोकनाट्य, सत्यशोधकी आणि आंबेडकरी जलसे यांचा हा परिचय ठरतो. लोकरंगभूमीच्या आधुनिक रूपातील जलसे, पथनाट्य, रिंगणनाट्य यांचा आलेख मांडण्याचा उद्देश लक्षात घ्यावा लागतो. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकरंगभूमी यांचा परंपरागत अनुबंध सिद्ध करताना लोकतत्त्व आणि इहतत्त्वाच्या परंपरांचा आंतरसंबद्ध असा अनुबंध कळावा ही भूमिका या लेखनातून नव्याने मांडण्यात आली आहे. परंपरा आणि नवता यांचा तानाबाना सतेच आदिम, लोक आणि नागर (अभिजन) या परंपरातील साम्य-भेदासह परस्पर अनुबंध आणि वेगळेपणा कसा महत्त्वाचा ठरतो, याची अभ्यासाची भूमिका तटस्थपणे घेतली आहे.