चौकट
मानवी जीवन हे अगम्य आणि अनाकलनीय आहे. जन्माला येणारा प्रत्येक माणूस कोणतं दान पदरात घेऊन जन्माला येईल ते सांगता येत नाही. आयुष्य साधं, सोप आणि सरळ कधीच नसतं. वेदनांनी, दुःखांनी, खाच खळग्यांनी आणि संकटांनी ते भरलेलं असतंच. आपण माणसांना बाहेरूनच पाहतो आणि निष्कर्ष काढतो की हा किती सुखी आहे. पण प्रत्यक्षात तसं नसतं. त्या माणसांनी सांगता न येणार्या वेदना आणि दुःख भोगलेली असतात. अपमान आणि उपेक्षा पचवलेली असते. या सार्या जखमा भळभळतच असतात. तरीही माणसं आयुष्याला सामोरं जातच असतात. पेच सोडवत असतात. आशेचा किरण शोधत असतात. अशा माणसांच्या जीवन कहाण्या वि.दा.पिंगळे यांच्या ‘चौकट’ या पुस्तकात वाचायला मिळतात.