बाबाराव मुसळे नावाचा माणूस आणि त्यांचे साहित्य
ग्रामीण आणि दलित साहित्याच्या चळवळींचा उदय १९७० नंतर झाला आणि मराठी साहित्यामध्ये खर्याखुर्या अर्थाने परिवर्तनाला प्रारंभ झाला. अशा परिवर्तनाच्या कालखंडात लेखन करणारे आणि मराठी साहित्यातील परिवर्तनाला हातभार लावणारे एक महत्त्वाचे लेखक म्हणून बाबाराव मुसळे यांच्या साहित्याचा विचार करावा लागतो. प्रारंभी कविता आणि कथा लिहिणारे बाबाराव मुसळे १९८५ मध्ये कादंबरी लेखनाकडे वळले. ‘हाल्या हाल्या दुधू दे’ ही त्यांची गाजलेली पहिली कादंबरी. त्यानंतर त्यांनी लिहिलेली ‘झळाळ’पर्यंतची प्रत्येक कादंबरी महत्त्वाची आहे, असे लक्षात येते. ग्रामीण माणूस, त्याचे जगणे आणि त्याची सुखदु:खे त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या सुखदु:खांचे चित्रण ते करतातच. पण त्या माणसांचे ‘माणूसपण’ साकारणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. जातीनं दिलेलं दु:ख असो की परिस्थितीनं दिलेलं दु:ख असो, ते तेवढ्याच समर्थपणे चित्रित करतात आणि माणसाच्या माणूसपणाची पताका फडकावीत राहतात.