कानबाई
खानदेशवासी आणि कानबाई यांचे नाते फार प्राचीन काळापासूनचे आहे. कानबाईला सामान्यातल्या सामान्यापासून ते उच्चवर्णियापर्यंत सारचे पुजतात, भजतात. काहींचे तर कुलदैवत कानबाई आहे. कानबाईची गाणी खानदेशचे वैभव अन् खानदेशवासीयांचा अमुल्य ठेवा आहे. तिची विधी अन विधीतील असंख्य गाण्यांतून खानदेशातील समाजाची प्राचीन परंपरा, रूढी, आचार-विचारांचे वाङ्मयाचा अभ्यास येथील लोकसंस्कृतीचा अभ्यास ठरावा.
आजही खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत आणि पूर्वीच्या खानदेशात मोडणारे आज नाशिक जिल्ह्यात गणले जाणारे नांदगाव, मालेगांव, सटाणा, कळवण येथेही कानबाईचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कानबाईचा कान्हदेश म्हणजेच खानदेश होय. कानबाई ही खानदेशाची प्रमुख ग्रामदेवता आहे. कानबाईला कानोडही म्हटले जाते. ती नवसाची देवता असून, तिला नवस, अहिराणीत कारणपरत्वे मानता मानले जाते. कानबाईच्या उत्सवाला ‘रोट’ म्हणण्याची प्रथा आहे.