गुलाबाई
महाराष्ट्रात गणपती विसर्जनानंतर दुसर्या दिवशी भाद्रपद पौर्णिमेस गुलाबाई उत्सवाला सुरूवात होते. गुलाबाई कुमारिका मुलींची देवता. ती महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने पुजली जाते. खानदेशात गुलाबाई म्हणूनच पुजली जाते. मात्र, गुलाबाईची गाणी सर्वत्र सारखीच म्हटली जातात. भाद्रपदाच्या हिरव्या हिरवळीत उमललेली विविध रंग-गंधांची फुले, भिरभिरणारी फुलपाखरे आणि रंगबिरंगी पोशाखातील या बालफुलराणींचा समूह, रोज सायंकाळी घरोघरी अंगणी अथवा ओट्यावर हाताची हातावर टाळी देत किंवा टिपरीवर टीपरी देत त्या ताला - सुरात गुलाबाईची गाणी गातानाचे दृश्य दिसत असते. ‘कन्या’ साक्षात लक्ष्मीचे रूप. तिच्या पायगुणांनी सासरी-माहेरी सुख-समृद्धी नांदत असते. म्हणूनच सण-उत्सवप्रसंगी सासरघरी असणार्या लेकीला ‘मूळ’ लावून माहेरी आणले जाते. आजही खानदेशात ही प्रथा निभावली जाते. गुलाबाई-गुलोजींना शंकर-पार्वती मानली जाते, समजले जाते. मला माझ्या माहेरी पोहोचवा म्हणूनच पार्वती शंकराला सांगते. शंकराबरोबर पार्वती म्हणजेच गुलोजीबरोबर गुलाबाई रूपात जी भाद्रपद मासात माहेरी येते. म्हणूनच भाद्रपद महिला आला की माहेरवासींना अन् विशेष आनंद मुलींना होता. या आनंदाचा लाभ त्यांना महिनाभर मिळतो.