गौराई
खानदेशात चैत्रचावदस (चैत्र चतुर्दशी) पासून ‘गौराई’ उत्सवास सुरुवात होते. घराण्याच्या प्रथेनुसार गौराईची स्थापना अन् ठरवलेल्या दिवसानुसार उत्सव होत असतो. ‘अक्षय तृतीया’ वैशाख शुद्ध तृतीयेला खानदेशातील तिन्ही जिल्ह्यात ‘आखाजी’ म्हणतात. आखाजीला चैत्रगौरीचा उत्सव असतो. गौरी तथा गौराईला खानदेशी अहिराणीत ‘गवराई’ म्हणतात. गौर वर्णाची ‘गवराई’ रूपाने चैत्रात चावदसला खानदेशात माहेरवासाला येते, तर वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत थांबते. गौराईचे माहेरी आगमन होते, त्यावेळी तिच्या स्वागतासाठी चैत्रातले सौंदर्य फुललेले असते. वसंत ऋतूतील हरित, तांबूस लुसलुशीत पर्णराजीत झुळझुळणारा मंद-मंद वारा, विविधरंगी फुलांचा गंध पसरवीत असतो. हिरव्याकंच आंब्यावर तांबूस, पिवळ्या कैर्यांचे झोका झुला झुलत असतात, मनाला मोहविणार्या वसंतातील सौंदर्यात, पक्ष्यांचे संगीतत्यात घरोघरी अंगणातील झुल्यावर गौराईची गाणी गुंजत असतात.