मराठीचा भाषिक अभ्यास
मनुष्य हा दैनंदिन जीवनातील सर्व व्यवहार भाषेद्वारे पूर्ण करीत असतो. भाषा वापरून तो आपल्याला हव्या असणार्या गोष्टींची पूर्तता करतो. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भाषा हे एकमेव माध्यम मनुष्याच्या व्यवहारातील गरजा पूर्ण करण्यास हातभार लावत असते. माणूस हा भाषेद्वारे प्रेम व्यक्त करतो. भाषेद्वारे रागवतो. भाषेद्वारे शिव्याही देतो. एखाद्या व्यक्तीचा निर्देश तो भाषेचा वापर करून करीत असतो. भाषा हे साधन माणसाच्या गरजापूर्तीसाठी निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे असेच म्हणावे लागेल. प्राचीन मानव हा दैनंदिन व्यवहार पूर्ण करीत असताना भाषा अवगत नसण्याच्या कालखंडात हावभाव किंवा निर्देश करून संदेशन प्रक्रिया पूर्ण करीत होता. कालांतराने मानवाच्या प्रगतीबरोबर त्याची भाषिक क्षमताही विकसित होत गेली व मानव अर्थपूर्ण रचना असणार्या ध्वनीद्वारे व्यवहार पूर्ण करू लागला. या रचनेलाच भाषा संबोधले जाऊ लागले.