कर्तव्याचा महामेरू
लोकसेवक स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांचे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे, हे आपणांस विदित आहेच. त्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान अनेक अभ्यासकांनी शब्दबद्ध केलेले आहे; परंतु दूरचित्रवाणी वाहिन्यांचा सुकाळ आणि समाजमाध्यमांचा भडिमार यांमुळे वाचनाकडे थोड्याअंशी का होईना दुर्लक्ष होत आहे, हे मान्य करावेच लागेल. त्यामुळे भावी पिढीपर्यंत जुन्या-जाणत्यांचे, समाजधुरिणांचे योगदान, कार्य पोहोचू शकत नाही. ही उणीव भरून काढण्याचा एक अल्पसा प्रयास करावा, हा विचार पुढे आला. जनता शिक्षण मंडळाचे सचिव श्री. प्रभात चौधरी आणि प्रा. साहेबराव भुकन यांच्याशी केलेल्या चर्चेचे फलित म्हणजे लोकसेवक मधुकरराव चौधरी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन होय.