‘मा ती’
लतिका चौधरी या विविध वाङ्मय प्रकारांमध्ये सकस साहित्य निर्मिती करणार्या समर्थ लेखिका आहेत. कथा, कादंबरी, ललित गद्य या वाङ्मय प्रकारांमधून त्यांनी लेखन केलेले आहे. शिवाय बाल वाचकांना तोषविण्यासाठीही निर्मिती केली आहे. परंतु काव्य लेखनामध्ये त्या अधिक रमतात असेही म्हणावे लागते. कारण काव्यलेखन म्हणजे अंतरात्म्याचा उत्कट असा आविष्कार असतो. मा ‘ती’ हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह. ‘ती’ ची व्यथा अन् वेदना अत्यंत सूचक पद्धतीने या कविता संग्रहातून व्यक्त होते. समाजामध्ये परिवर्तन व्हावे, शोषित-पीडितांना मुक्तपणे श्वास घेता यावा या प्रेरणेतून त्यांचे सारेच लेखन अवतरते. कविता त्यामुळेच अधिक उत्कट होऊन जाते. लतिका चौधरी यांचा आणखी एक विशेष असा की, त्या मराठी बरोबरच अहिराणीमध्येही तेवढ्याच ताकदीने निर्मिती करतात. ‘त्रिकोणातील वादळ पेलताना’ ही त्यांची बहुचर्चित कादंबरी. खानदेशची भूमि साहित्य निर्मितीच्या दृष्टाने अतिशय सकस आहे. त्या परंपरेत त्यांचाही समावेश होईल यात काही शंका नाही.