शाहिरीचे स्फूर्तीगान
मराठी भाषा ऐहिक जीवनाच्या पातळीवर उतरली. वीररसाने परिपूर्ण भरली. पराक्रम हेच पुरुषाचे सौंदर्य. या सौंदर्याचेच यशोगान या शाहिरांनी आपल्या कवनाद्वारे गाईले आणि मराठी कवितेचा उष:काल झाला. शाहिरांची रसरसती कविता पुढे वीर वर्णनातच गुंतून न राहता ती सप्तशृंगाराने विभूषित झाली. शाहिरांनी तत्कालीन वातावरण आणि परिस्थिती आपल्या कवनातून व्यक्त करायला सुरुवात केली. असे असंख्य शाहीर महाराष्ट्राला लाभले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत शाहिरांनी केलेल्या क्रांतीपर्वाचा मोलाचा वाटा आहे. शाहीर शिवाजीराव पाटील हे त्याच पर्वणीतले शाहीर.
त्यांच्या एकूणच काव्याचे आकलन करता, त्यांच्या काव्यात अनेक घटनांना विशेष स्थान असल्याचे दिसते. त्यांनी उमटवलेल्या ‘शाहिरी गण’, ‘गौरवशाली महाराष्ट्र’, ‘भारतमातेच्या शूरवीरांनो’, ‘त्रिवार जयजयकार’ आणि ‘शाहिरी मुजरा’ या कवनातून गतइतिहासातील पूर्व परंपरा देऊन राष्ट्रीय भावनेचा आविष्कार करणारी गीतं जनमानसात नवा जोम आणणारी आहेत.
शाहीर शिवाजीराव पाटील यांनी हरएक काव्यातून नव्या विचार-आचारांचे दर्शन घडविले आहे. आज सुदृढ समाजाची आवश्यकता भासते आहे. शेवटी चांगला माणूस निर्माण करणं ही काव्य-साहित्याची मूळ धारा आहे. नवसर्जनाचा वारसा पुढे चालावा, त्याला नवनवे धुमारे फुटत राहावेत, शिवाय नव-विचारांचे दर्शन घडविणे आणि लोकहितासाठी जागल्याची भूमिका करीत राहणे ही काळाची गरज शाहीर शिवाजीराव पाटील आजवर प्रामाणिकपणे करीत आहेत.
- प्रभाकर ओव्हाळ, पुणे