तळमळीचा तळ
अजीम नवाज राहींच्या कविवेतील अनुभवांच्या दाहक झळा आणि त्या झळा अभिव्यक्त करणारी तितकीच मोहक शब्दकळा मराठी कवितेच्या वाचकांना आता परिचयाची झाली आहे. त्यांचा व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातल्या एकांतातून फिरून वर्तमानाची वतनदारी करत तळमळीच्या तळापर्यंत येऊन ठेपला आहे. कविता आरशासारखी समोर धरून त्यात कवीचे चरित्र न्याहाळावे इतकी जगणे आणि लिहिणे यात तसूभरही अंतर न ठेवता वास्तवाशी इमान राखणारी ही कविता आहे. कल्पनेच्या हस्तीदंती मनोर्यात रमण्याचा तिचा स्वभाव नाही.जगण्यात कवितेचा आणि कवितेत जगण्याचा उत्सव साजरा करत आपल्या दुःख आणि वेदनेला श्रीमंत करण्याची आस हे अजीम नवाज राही यांच्या काव्य प्रतिभेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ‘तळमळीचा तळ’ हा त्यांचा नवा संग्रह म्हणजे त्या श्रीमंतीत झालेली वाढ आहे.