गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ
कृषिसंस्कृतीचे मूल्यात्मक अस्तित्व तोलून धरणारा ‘शेतकरी बाप’ हा रमेश पवार यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. बाप - मुलगा या वैयक्तिक भावबंधाचा धागा त्यात गुंफलेला आहेच. बालपणापासून कष्टकरी बापाची मनात ठसत गेलेली प्रतिमा, कविमनाच्या अस्वस्थतेला आकार देणारा एक धागा आहे. हा धागा उकलतानाच बापाच्या जगण्या-भोगण्याची पडझड शब्दबद्ध करतानाच गावगाड्याची होत गेलेली वाताहतही हे कविमन शब्दांच्या चिमटीत पकडू पाहते. काळाच्या रेट्यात अपरिचित होत चाललेल्या गावखेड्याच्या विरूप रंगरूपाविषयीचा अस्वस्थ उद्गार ही कविता व्यक्त करते. मात्र, भेगाळलेल्या मातीतून उगवलेल्या कोंबावर या कविमनाची प्रगाढ श्रद्धा आहे. त्या बळातूनच आकारास आलेली, गावाचे गावपण धुंडाळणारी, गावपणाशी असलेले आपले आंतरिक नाते टिकविण्याची धडपड करणारी आणि शेतकरी बाप या वैयक्तिक भावबंधाच्या कोंदणातून उमललेली ही कविता जाणकारांचे लक्ष वेधून घेणारी आहे. - आशुतोष पाटील